संकेतरेखा नवभारतस्य
प.पू. कै. अप्रबुद्धांनी लिहिलेल्या ‘ब्रह्मर्षि अण्णासाहेब पटवर्धन’ ह्यांच्या चरित्रात दोन संस्कृत स्तोत्रांचा समावेश आहे. त्यापैकी एका स्त्रोत्रातील 5 वा श्लोक खालीलप्रमाणे आहे. सा केतकीपत्र सुगौर मूर्ति ।साकेत केशस्ययशः प्रपूर्तिः ।संकेत रेखा नवभारतस्यदृशां नराणां कृतकृत्यतैव । अर्थ – श्रीरामाच्या यशाची फाकलेली प्रभाच जणू अशी ती केवड्याप्रमाणे गौर मूर्ती, आधुनिक भारत कसा असावा याचे उदाहरण घालून देत, लोकांच्या दृष्टीचे पारणे फेडणारी होती. खरे तर हे शब्द आहेत ब्रह्मर्षि अण्णासाहेब पटवर्धन यांचेविषयी. अभिनव भारत कसा असावा व कसा नसावा हे त्यांनी त्यांच्या आचरणातून दाखवून दिले. त्यांची आवड विधी (कायदा) विषय शिकण्याची म्हणून विधिशाखेचा अभ्यास करीत असताना मित्राचे वैद्यकीय महाविद्यालय बघायला गेले अन् त्याचा शब्द राखण्यासाठी वैद्यकाचाही अभ्यास सुरू केला. एकाच वेळी विद्यापीठात दोन वेगवेगळ्या विद्याशाखांचा अभ्यास अग्रगण्य राहून केला. इतकेच नव्हे तर पाश्चात्त्य वैद्यक शिकायचं तर आधी भारतीय वैद्यक आलं पाहिजे म्हणून आयुर्वेदाचाही अभ्यास त्याच वेळी केला. इतका चांगला की त्या काळांत ते दोन जनरल्स काढत असत, एक भारतीय वैद्यकावर व दुसरे पाश्चात्त्य वैद्यकावर, जी ब्रिटनमध्ये सुद्धा नावाजलेली होती. त्यातून त्यांनी सप्रमाण सिद्ध केलं होतं की भारतीय वैद्यक श्रेष्ठ आहे. भारतीय तरुणांनी असं असावं. आपापल्या काळांत प्रतिष्ठित असलेलं ज्ञान अवश्य शिकावं; पण त्यासाठी मूळ भारतीय परंपरा सोडण्याचं कारणच नाही उलट दोन्हीकडे जे हितकारक दिसेल त्याची सांगड घालून यशस्वी, संपन्न आयुष्य जगावं. म्हणून ते (ब्रह्मर्षि अण्णासाहेब) ठरले, ‘ संकेतरेखा नवभारतस्य’. वडिलांनी सांगितले की वैद्यकावर पोट भरणं उचित नाही, तेव्हा उपजीविका चालविण्यासाठी वकिली आणि सेवा…