आज आपणा सर्वांना आपापल्या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायची इच्छा असते. सरकारी नोकरी, बँक, शाळा, महाविद्यालय, खासगी कंपनी, क्रीडा, सामाजिक कार्य, व्यवसाय, उद्योगधंदे इत्यादी कुठल्याही क्षेत्रात काम करणारी माणसे असो अथवा विद्यार्थी असो, यशस्वी प्रत्येकालाच व्हायचे असते. पण हे त्रिकालाबाधित सत्य आहे की सगळेच यशस्वी होत नाहीत. कारण यश मिळविण्यासाठी आवश्यक गुणांची आराधना लोक करीत नाही. जगात 3 प्रकारची लोकं असतात. पहिले ‘कष्टाळू’, दिवसरात्रीची पर्वा न करता प्रचंड मेहनत करणारे, काम पूर्ण झाल्याशिवाय आराम न करणारे लोक म्हणजे कष्टाळू. यश केवळ कष्टाळू लोकांनाच प्राप्त होते. दुसर्या प्रकारचे लोक असतात ‘कष्ट-टाळू’ आणि तिसरे ‘कसं टाळू’. या दोन प्रकारच्या लोकांना कधीच यश मिळत नाही. आपण मात्र विचार करावा की आपण या तीन श्रेणींमध्ये कुठे बसतो. कारण आज मी ज्या चरित्राबद्दल लिहिणार आहे ती व्यक्ती निःसंशय यशस्वी होती आणि म्हणूनच कष्टाळू होती. पण म्हणतात ना नायकाला समजायचे तर आधी खलनायक समजावा लागतो. रामचंद्र समजून घ्यावयाचे तर पहिले रावण समजावा लागतो. कृष्ण समजावून घ्यावयाचे तर पहिले कौरव समजावे लागतात. तद्वत शिवाजीराजांना समजून घ्यायचे असेल तर तत्कालीन परिस्थिती समजून घ्यावी लागते.
एका बाजूला तर धातुशास्त्र, आयुर्वेद, योग, दर्शनशास्त्र, वेद, कला, संगीत, स्थापत्य यांनी बहरलेला आमचा देश. सुसंपन्नता, सौख्य, स्थैर्य हेच ज्याचे गुणालंकार होते आणि चारित्र्यवान, सुहृदयी, संवेदनशील, समाधानी प्रजा ही ज्याची परिचायक होती अशा सनातन धर्माचा भारत देश. पण जशी संपन्नता येते तशी ती लुटणारे पण येतात. शक, हूण, कुशाण, अलेक्झांडर असे अनेक आक्रमक आले पण त्या त्या वेळी आमचे खंदे वीर उभे राहिले अन् या आक्रमणांना नेस्तनाबूत करते झाले. पण 1300 वर्षापूर्वी आमचं समाजमन बदलले. कर्मयोगाची जागा स्वार्थाने घेतली. देशापेक्षा स्वतःचा परिवार, पैसा महत्त्वाचा वाटू लागला, त्यासाठी लोक विश्वासालाही तडा द्यायला तयार झाले आणि इथेच घात झाला. इ.स. 711 मध्ये मोहम्मद बिन कासीमच्या नेतृत्वात प्रचंड मोठे आक्रमण झाले आणि आमचा वायव्य सरहद्द प्रदेश बेचिराख करून टाकण्यात आला. पुढे जवळ जवळ 400 वर्ष ही बाहेरून येणारी इस्लामी आक्रमणे आणि राजपूत यांचा संघर्ष कमी अधिक प्रमाणात सुरू राहिला; पण 1193 ला मोहम्मद शहाबुद्दीन घोरीने आमचा पूर्ण पराभव केला व आम्ही दिल्ली गमावून बसलो. संपूर्ण भारतात भयानक सुलतानी आक्रमणांचा आगडोंब उसळला. लोकांना आरीने चिरणे, हजारो लोकांची मुंडकी उडवून त्याचे मिनार रचणे किंवा तोरण बांधणे, गावातील लोकांना चारही बाजूंनी घेरून त्यांची कत्तल उडविणे, तरुण मुली अन् महिलांवर लांडग्यांप्रमाणे तुटून पडत त्यांच्या अब्रूच्या चिंधड्या उडविणे, मंदिरांची तोडफोड, प्रचंड लूट असा भयावह खेळ सुरू झाला. अर्जे मामलिक अल्लाउद्दीन खिलजीच्या महाराष्ट्रावरील आक्रमणानंतर तर 300 वर्षे उलटून गेली की प्रतिकारच झाला नाही. अखिल हिंदुस्थानात एकही हिंदू राज्य जिवंत राहिले नव्हते. लाहोर ते कलकत्ता व काश्मीर ते नर्मदा या विस्तीर्ण भागात मोगल सल्तनत पसरली होती. दक्षिणेमध्ये आदिलशाह, निजामशाह, इमादशाह, कुत्बशाह तर किनारपट्टीवर डच, फे्रंच, पोर्तुगीज, ब्रिटिश असे युरोपीय शत्रू आपले पाय रोवून बसले होते. भारताची सर्वार्थाने लूट चालली होती. या जुलमी शक्तींविरुद्ध बोलण्याची कुणाचीही छाती नव्हती. अन् कुणी बोललेच तर त्याची घरादारासकट राखरांगोळी होत असे. प्रजाजन सतत अनिश्चिततेच्या गर्तेत बुडाले होते. स्वाभिमान मेला होता, पराक्रम संपला होता, सुलतान देश सोडत नाही, पुन्हा कुणी हिंदू सिंहासनाधीश्वर छत्रपती होत नाही, आता आपण जिंकू शकत नाही असे विचित्र समाजमन झाले होते. आणि अशा भयावह पार्श्वभूमीवर एक महिला म्हणत होती की ही परिस्थिती मी पालटून लावेन. माझा पुत्र मी असा घडवेन की जो हे सगळे उधळून लावेल. या महिलेचे नाव होते सकलसौभाग्यसंपन्न जिजाऊसाहेब.
फाल्गुन वद्य तृतीया, 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवाई देवीचे अधिष्ठान असलेल्या शिवनेरी गडावर या मातेला पुत्र झाला. नाव ठेवण्यात आले ‘शिवबा’ म्हणजेच शिवाजीराजे. पुढची 14-15 वर्षे तर पालक म्हणून आपणा सर्वांना मार्गदर्शकच आहेत. आज मुले जेवत नाही म्हणून आया कार्टून लावून देतात, भाज्या आवडत नाही म्हणून सातत्याने जंक फूड खाऊ घालतात, असे करू नको – तसे करू नको असे सातत्याने ना-ना चा पाढा वाचतात, अती लाड करून नको नको त्या वस्तू, खेळणी, मोबाइल इत्यादी मुलांना आणून देतात; पण हे विसरून जातात की मुलांमध्ये या वयात फक्त एकच महत्त्वाचा गुण बाणवायचा असतो व तो म्हणजे, ‘हो, मी ते करू शकतो’ म्हणजेच ’धशी, ख लरप वे ींहरीं.’ जिजाऊमातांनी लहान लहान गोष्टीतून हा महत्त्वाचा गुण शिवबांना शिकविला. त्यांना मोकळीक दिली, अनुभव घेऊ दिला. त्यांच्या शारीरिक आणि मानसिक प्रशिक्षणाची योग्य सोय केली. लहान लहान सवंगड्यांसह खेळताना सामाजिक समरसता निर्माण होत होती, जातीपातीचे क्षणभंगूर मानापमान मनाला स्पर्शही करत नव्हते. शस्त्र अन शास्त्र म्हणजे आजच्या भाषेत प्रॅक्टिकल अन थिअरी यांचा प्रचंड अभ्यास सुरू होता. मन, मनगट तयार होत होते. आपल्याला यश मिळवायचे असेल तर पहिले आपण ज्या क्षेत्रात काम करणार आहोत त्याचे पूर्ण ज्ञान व ते काम करण्याचे पूर्ण तंत्र म्हणजे स्किल आपल्याला आत्मसात करावेच लागते. शिक्षक असेल तर विषयाचे संपूर्ण ज्ञान अन ते शिकविण्याचे तंत्र, वकील असेल तर कायद्याचे ज्ञान आणि ते मांडण्याचे तंत्र, डॉक्टर असेल तर वैद्यकीचे पूर्ण ज्ञान आणि उपचाराचे तंत्र येणे हे अवश्यमेव आहे. अवघ्या 15 व्या वर्षी स्वतःचे बोट चिरून उष्ण रक्ताने महादेवाला अभिषेक करताना शिवबांनी स्वराज्याची शपथ घेतली. म्हणजेच आजच्या भाषेत स्वतःच्या आयुष्याचे ध्येय (लाईफ मिशन) ठरविले. हे जो करतो तो क्लार्क म्हणून लागतो अन् मॅनेजर म्हणून निवृत्त होतो, रोखपाल म्हणून येतो व शाखाप्रमुख म्हणून निवृत्त होतो, विकेटकिपर म्हणून येतो कप्तान म्हणून जातो, शिक्षक म्हणून येतो व मुख्याध्यापक म्हणून जातो. अर्थात् सामान्य शिक्षक म्हणून लागला व सर्वोत्कृष्ट शिक्षक म्हणून निवृत्त झाला हे सुद्धा यशच आहे. पण सामान्य म्हणून आला व 30-35 वर्षे नोकरी करून सामान्य म्हणून गेला याला काय म्हणावे ? म्हणून प्रत्येकाचे एक जीवन ध्येय असावे, ते आपल्याला वेगाने प्रवास करायला मदत करते.
आता जवळच्या जिवलगांना हाताशी धरून हजार, बाराशे लोकांची सेना उभी झाली. तिच्या साह्याने आदिलशाही किल्ल्यांवर आक्रमणे सुरू झाली. तोरणा, मुरुंबदेवाचा डोंगर घेऊन राजगड, अनेक ठाणी, बाजारपेठा यावर मराठी तडाखे पडू लागले. सुरुवातीला दुर्लक्ष केलेल्या आदिलशाहीने नंतर मात्र फतेहखानाला मोठ्या सेनेनेशी पाठवले पण मराठी सेनेने त्यांचा फडशा पाडला. पुढची काही वर्षे राजांनी स्वराज्याची अंतर्गत शक्ती वाढविण्यात व प्रशासकीय व्यवस्था लावण्यात खर्ची घातली. पण 1656 ला गुप्तचरांनी बातमी आणली की आदिलशाह मरणासन्न आहे. हे कळल्याबरोबर शिवाजीराजांनी अचानक जावळी ताब्यात घेतली व आदिलशाहीला मोठा हादरा दिला.
शिवाजीसारखा एक बंडखोर मुलगा जावळी ताब्यात घेतो हे पाहिल्याबरोबर आदिलशाही सावध झाली व महापराक्रमी अफझलखानाला प्रचंड सेनेसह स्वराज्यावर पाठविण्यात आले. खानाने केलेले आक्रमण जबरदस्त होते, सुलतानी अत्याचारांना ऊत आला होता. खानाला समोरासमोरच्या लढाईमध्ये परास्त करणे आज आपल्याला शक्य नाही हे जाणून राजांनी कूटयुद्धाचा पवित्रा घेतला. अफझलखानाला जावळीमध्ये भेटायला बोलावून राजांनी मार्गशीर्ष शु. सप्तमी, गुरुवार दि. 10 नोव्हेंबर 1659 रोजी नरसिंहाप्रमाणेच पुन्हा एकदा हिरण्यकश्यपूचा वध केला. यानंतर आलेले सिद्धी जौहर, शाहिस्तेखान, कर्तलबखान आदी संकटे राजांनी आपल्या बुद्धिकौशल्याने व पराक्रमाने उधळून लावली. शाहिस्तेखानाने पुण्याची जी वाताहत केली होती त्याचा बदला घेण्यासाठी राजे सुरतेवर जाऊन धडकले. जवळपास 1 कोटी रुपये लुटून शिवाजीराजांनी मोगलांची सुरत बदसुरत केली. असे एकावर एक जबरदस्त विजय मिळवत राजांनी आपले एक वेगळे स्थान निर्माण केले.
पण याचवेळी औरंगजेबाने मिर्झाराजा जयसिंहाच्या रूपाने स्वराज्यावर एक कर्दनकाळ पाठविला ज्याने स्वराज्य बेचिराख करून टाकले. एकीकडे पुरंदर गडावर आक्रमण तर दुसरीकडे सामान्य जनतेवर बेमुर्वत अत्याचार अशा दुहेरी कचाट्यात सापडलेल्या स्वराज्याला बाहेर काढण्यासाठी राजांना पुरंदरचा ऐतिहासिक तह करावा लागला. या तहान्वये शिवाजीराजांना आपल्या 35 किल्ल्यांपैकी 23 किल्ले मोगलांना देऊन टाकावे लागले फक्त 12 किल्ले राजे वाचवू शकले. राजांनी 22 वर्षे मेहनत करून उभे केलेले नंदनवन मिझाराजांनी पार उद्ध्वस्त करून टाकले. हा राजांचा प्रचंड मोठा पराभव होता. एका मोठ्या राजकारणांतर्गत राजांना औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्य्राला जावे लागले. औरंगजेबाने राजांवर नजरकैद घातली. आपल्या बुद्धिकौशल्याचा अजोड परिचय करून देत राजे आग्य्रातून निसटले. सारा हिंदुस्थान या घटनेने अचंबित झाला. पुढच्या काळात राजा छत्रसाल, कवी भूषण महाराजांना भेटायला आले ते याच घटनेचे प्रतिसाद म्हणून. राजे अन् त्यांचे सोबती स्वराज्यात सुखरूप परत आले. आता मोगलांशी निकराची लढाई करण्यासाठी राजांनी दंड थोपटले. इथे एका गोष्टीचे आश्चर्य वाटते ते म्हणजे राजांची स्थितप्रज्ञता व सकारात्मकता. आज आपण पाहतो की एखादा पेपर खराब गेला, एखादा विषय राहून गेला, एखादी नोकरी सुटली, धंद्यामध्ये 5-7 लाखांचे नुकसान झाले, कुणी जवळची व्यक्ती सोडून गेली की अनेक लोक निराश होऊन जातात, आयुष्यात काही राम राहिला नाही असे म्हणतात व जगायचेच सोडून देतात. मला सातत्याने एक प्रश्न पडतो की शिवाजी राजांपुढे असलेली संकटे पाहिली तर त्यापुढे आपली संकटे ती काय. अशी संकटे येतच असतात. आपल्याला त्यांच्याशी झुंजावेच लागते. राजे पूर्ण सामर्थ्यानिशी झुंझ देण्यासाठी तयार होते.
पण गेली 7-8 वर्षे सातत्याने आक्रमणे होत असल्याने स्वराज्याची घडी विस्कळीत झाली होती. राजांनी जवळजवळ तीन वर्षे कुठलीही नवीन मोहीम हाती न घेता स्वराज्याच्या मजबूत बांधणीकडे लक्ष दिले. एक मोठी झेप जेव्हा घ्यायची असते त्याआधी आपले पाय मजबूत करणे आवश्यक असते. आपण विद्यार्थी, शिक्षक, अभियंता, व्यवसायी, दुकानदार काहीही का असेना, यशस्वी व्हायचे असल्यास आपल्याला सातत्याने आपले गुण वाढवावे लागतात. मग मी शिक्षक असेल तर विषयावर असामान्य पकड, अवांतर वाचन, आवाज, विद्यार्थ्यांवरील पकड आदी बिंदू महत्त्वाचे असतात. मी व्यवसायी असेल तर माझ्या प्रॉडक्टची गुणवत्ता, ग्राहकांची मानसिकता, त्यांना आकर्षित करण्यासाठी आवश्यक गोष्टी, पैशाचा योग्य विनिमय इत्यादी विषयांवर लक्ष केंद्रित करावे लागते. विद्यार्थी म्हणून आपला अभ्यास, भाषा, संवाद कौशल्य, सादरीकरण (प्रेझेन्टेशन), कॉम्प्युटर स्किल्स असे सर्व विषय आत्मसात करावेच लागतात. हे प्रत्येक यशस्वी व्यक्तीने तिच्या आयुष्यात केलेले असते. शिवाजीराजांनी स्वराज्याच्या कमकुवत बाजू अचूक हेरल्या. राजधानी राजगडावर शत्रू चालून आला होता, हे धोकादायक होते. राजधानी सदैव बेलाग हवी म्हणून राजांनी आपली राजधानी दुर्गम अशा रायगडावर हलविली. शेतकर्यांसाठी योजना, सैनिकांसाठी योजना नव्याने तयार करण्यात आल्यात. मराठी भाषेवर होत असलेले यावनी भाषांचे आक्रमण रोखण्यासाठी ‘राजव्यवहारकोष’ निर्माण केला. स्वावलंबनाचा आदर्श घालत असतांना तोफा ओतण्याचा कारखाना सुरू केला. आरमारी सामर्थ्य वाढविण्यावर विशेष भर दिला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वराज्याचे सामरिक सामर्थ्य वाढवून तीन लाखांपेक्षा जास्त सेना उभी केली. आता राजे नवीन चढाईसाठी सज्ज होते. दख्खनवर महाराजांनी एल्गार केला आणि पुढच्या केवळ आठ वर्षांत 250 पेक्षा अधिक गड स्वराज्यात दाखल झाले. कोकण किनारपट्टीपासून ते मद्रासपर्यंत राजांनी तुफान उठवून दिले. राजांचा प्रताप भास्कराप्रमाणे तळपत होता. यावनी सत्ता पार टेकीला आल्या होत्या. अशातच राजांनी एक विलक्षण पाऊल उचलले व ते म्हणजे राज्याभिषेक. गेली 300 वर्षे एकही हिंदू राजाला राज्याभिषेक झालेलाच नव्हता. शिवाजीराजांच्या रूपाने वर्षानुवर्षांनी पहिला हिंदू भूपती सिंहासनाधिश्वर छत्रपती होत होता. ज्येष्ठ शु. त्रयोदशी, 6 जून 1674 हा दिवस इतिहासात स्वर्णाक्षरांनी नोंदल्या गेला. इस्लामी आक्रमकांच्या भयावह आक्रमणाला यशस्वीपणे तोंड देऊन राजांनी स्वपराक्रमाने हे धवल यश संपादन केले होते आणि तरीही त्यांची वृत्ती निष्काम कर्मयोग्याचीच होती. स्वकर्तृत्वाने स्वराज्य घडवूनही राजे म्हणत होते की ‘हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे.’
भारताला चारही बाजूंनी झोडपून काढणार्या आतंकी सुल्तानांपासून मुक्त करण्याचा विडा उचललेले शिवाजीराजे आमरण आपल्या प्रतिज्ञेला डोळ्यापुढे ठेऊन कार्यरत होते. आज आपल्याला आपल्या आयुष्यात मोगलांना हाकलून लावायचे नाही की इंग्रजांविरुद्ध लढायचे नाही. हे काम शिवरायांसारख्या लोकांनी आधीच केलेले आहे. आज आम्ही आपल्या आयुष्यात पुढे जात असतांना आपल्या घरपरिवारासाठी निर्भेळ यश प्राप्त करू शकतो का इतकाच विचार करायचा आहे. हे करत असतांना ज्या ज्या गुणांची आवश्यकता पडणार आहे ते मिळविण्याचा प्रयास आपल्याला करावा लागणार आहे. पण हे सगळे करत असतांना फक्त मी, माझे घर, माझी मुले इतकाच विचार आपण करणार असू तर मग ते यश एकांगी असेल. विचार करा की शिवाजी महाराज आपले पॅकेज सांभाळण्यासाठी मोगलांकडे नोकरीसाठी गेले असते तर ? गांधीजी आफ्रिकेमधून परतच आले नसते तर ? सावरकरांनी इंग्लंडमध्ये ब्रिटिशांची नोकरी धरली असती तर ? भगतसिंग लग्न करून फक्त आपल्या कुटुंबासाठी जगले असते तर ? आज आपण ज्या मुक्त, स्वतंत्र भारतात स्वतःचे करिअर घडवू शकतोय, ते फक्त या लोकांनी आपल्या सुखांना तिलांजली दिली म्हणूनच. आज आपले कर्तव्य आहे की आपण आपले करिअर घडवित असतांना ज्या समाजात राहतो त्यासाठी काही ना काही द्यावे. मग मी झाडे लावू शकतो, संस्कार वर्ग चालवू शकतो, फूटपाथवर राहणार्या मुलांसाठी काही काम करू शकतो, गरीब विद्यार्थी, घराघरांमध्ये एकटेच राहणारे वृद्ध दाम्पत्य, अनाथ, शेतकरी अशा अनेक लोकांना आज आपली गरज आहे. पण आपण आपले हात त्यांच्यापर्यंत पोचवू शकलो का हाच मोठा प्रश्न आहे. चला, शिवरायांच्या आयुष्यातून प्रेरणा घेत असतांना काहीतरी भव्य दिव्य घडवू या. तसेच या समाजाचेही मी काही देणे लागतो ही भावना मनात ठेऊन काम उभे करू या. मग भारताचा तो सुवर्णयुगाचा काळ परत येऊन आपण आपल्या भारतमातेला पुन्हा एकदा विश्वगुरूपदावर आरूढ झालेले याची देही याची डोळा पाहू असा विश्वास वाटतो.
डॉ. सुमंत दत्ता टेकाडे,
शिवचरित्र अभ्यासक व कॉर्पोरेट ट्रेनर, नागपूर. भ्र. 9923839490