संकेतरेखा नवभारतस्य

प.पू. कै. अप्रबुद्धांनी लिहिलेल्या ‘ब्रह्मर्षि अण्णासाहेब पटवर्धन’ ह्यांच्या चरित्रात दोन संस्कृत स्तोत्रांचा समावेश आहे. त्यापैकी एका स्त्रोत्रातील 5 वा श्‍लोक खालीलप्रमाणे आहे.

सा केतकीपत्र सुगौर मूर्ति ।
साकेत केशस्ययशः प्रपूर्तिः ।
संकेत रेखा नवभारतस्य
दृशां नराणां कृतकृत्यतैव ।

अर्थ – श्रीरामाच्या यशाची फाकलेली प्रभाच जणू अशी ती केवड्याप्रमाणे गौर मूर्ती, आधुनिक भारत कसा असावा याचे उदाहरण घालून देत, लोकांच्या दृष्टीचे पारणे फेडणारी होती.

खरे तर हे शब्द आहेत ब्रह्मर्षि अण्णासाहेब पटवर्धन यांचेविषयी. अभिनव भारत कसा असावा व कसा नसावा हे त्यांनी त्यांच्या आचरणातून दाखवून दिले. त्यांची आवड विधी (कायदा) विषय शिकण्याची म्हणून विधिशाखेचा अभ्यास करीत असताना मित्राचे वैद्यकीय महाविद्यालय बघायला गेले अन् त्याचा शब्द राखण्यासाठी वैद्यकाचाही अभ्यास सुरू केला. एकाच वेळी विद्यापीठात दोन वेगवेगळ्या विद्याशाखांचा अभ्यास अग्रगण्य राहून केला. इतकेच नव्हे तर पाश्‍चात्त्य वैद्यक शिकायचं तर आधी भारतीय वैद्यक आलं पाहिजे म्हणून आयुर्वेदाचाही अभ्यास त्याच वेळी  केला. इतका चांगला की त्या काळांत ते दोन जनरल्स काढत असत, एक भारतीय वैद्यकावर व दुसरे पाश्‍चात्त्य वैद्यकावर, जी ब्रिटनमध्ये सुद्धा नावाजलेली होती. त्यातून त्यांनी सप्रमाण सिद्ध केलं होतं की भारतीय वैद्यक श्रेष्ठ आहे.

भारतीय तरुणांनी असं असावं. आपापल्या काळांत प्रतिष्ठित असलेलं ज्ञान अवश्य शिकावं; पण त्यासाठी मूळ भारतीय परंपरा सोडण्याचं कारणच नाही उलट दोन्हीकडे जे हितकारक दिसेल त्याची सांगड घालून यशस्वी, संपन्न आयुष्य जगावं. म्हणून ते (ब्रह्मर्षि अण्णासाहेब) ठरले, ‘ संकेतरेखा नवभारतस्य’.

वडिलांनी सांगितले की वैद्यकावर पोट भरणं उचित नाही, तेव्हा उपजीविका चालविण्यासाठी वकिली आणि सेवा म्हणून वैद्य अशा दोन भूमिका ते जगले. त्याचबरोबर भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ते अग्रणी होते. पुण्याच्या तत्कालीन महापालिकेत ते निवडूनही आले होते. ते आळंदीच्या श्री नरसिंव्हसरस्वती स्वामी महाराजांचे निस्सीम भक्त होते तसेच आईकडून आलेली गणेशोपासनाही करीत होते व इतरांकडून करवूनही घेत होते.

निरन्तर कार्यमग्नता, उत्साह, पांडित्य, भक्ति-समर्पण, राजनीति हे बलसंपन्न शरीराशिवाय साधणारं आहे थोडंच ! भारतीय समाज हा असा असला पाहिजे – बलिष्ठ, निरोगी, उत्साही, बुद्धिमान, देव-देश यांची भक्ती करणारा, उत्तम ते ते आत्मसात करणारा, प्रवाही तरीही मुळं आपल्याच संस्कृतीत घट्ट रुजलेला.

तो तसा घडवण्यासाठी, टिकविण्यासाठी पिढ्यान्पिढ्या प्रयत्न होत राहतील. “प्रज्ञालोक” त्याचाच एक भाग. म्हणून प्रज्ञालोकनी संकेतरेखा नवभारतस्य हे घोषवाक्य म्हणून स्वीकारलं आहे. आधुनिक भारत कसा असावा याचं चिंतन, दिग्दर्शन इथे प्रकट व्हावं असं अभिप्रेत आहे. जो कुठला विषय आपल्या आवडीचा, चिन्तनाचा असेल त्यात भारतीय काय?, त्यापेक्षा वेगळं काय ?, त्यातलं काय स्वीकारावं ?, कसं रुजवावं-वाढवावं म्हणजे ही संस्कृती, हा देश गौरवान्वित होईल ? जगांत प्रतिष्ठा पावेल, याची चर्चा इथे मुक्तपणे करावी.

ही हिन्दुभूमी, वैदिक संस्कृती चिरंजीवी आहेच. भगवंताचाच तसा संकल्प आहे. गोवर्धन उचलणारा मुख्य श्रीकृष्णच ! त्याला आपल्या काठीची साथ !!

Share your love