पू. अनंतराव आठवले यांचा जन्म अनंत चतुर्दशी शके 1842 दि. 28.8.1920 या दिनी पुणे येथे झाला. त्यांच्या आईचे नाव साधाबाई व वडिलांचे नाव दामोदर होते. ते दासगणू महाराजांचे शिष्य व मानसपुत्र होते. त्यांचा आवाज भरदार, मर्दानी व सुरेल होता. ते दासगणू महाराजांच्या कीर्तनात गाण्याची साथ करीत. त्यांचा आवाज आणि देखणे रूप पाहून संगीत नाटक मंडळींकडून त्यांना भूमिका करण्यासाठी निमंत्रण येत. पण त्यांनी दासगणू महाराजांची कीर्तनातील गायनाची सेवा सोडली नाही. त्यांचा अकाली मृत्यू झाला. त्यावेळी अप्पा (अनंतराव) दीड वर्षांचे होते. तेव्हापासून त्यांचा सांभाळ त्यांच्या मातेने व दासगणू महाराज यांनी केला.
त्यांचे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण पंढरपुरात आपटे प्रशाळा व लोकमान्य विद्यालयात झाले. पुढे आयुर्वेद महाविद्यालयातून ते पदवीधर झाले व त्याच महाविद्यालयात प्राध्यापक व पुढे प्राचार्य झाले. त्यांचा विवाह पंढरपूरचे स्टेशनमास्तर लिमये यांची कन्या इंदिरांशी झाला. सौ. इंदिरा म्हणजे साक्षात् लक्ष्मीच होत्या.
महाकवींच्या सान्निध्यात प्रतिभेला बहर
संतकवी दासगणू महाराज हे महाकवी. आपण बोलतो तशा काव्याच्या ओळी त्यांच्या मुखातून आपोआप बाहेर पडत. त्यांच्या मांडीवर बसून अप्पा काव्य ऐकत ऐकत लहानाचे मोठे झाले व त्यांच्या उपजत प्रतिभेला अंकुर फुटले. दासगणूनी एकदा श्लोकाच्या तीन ओळी म्हटल्या तर बाळ अनंताने चौथी ओळ म्हटली. दादांनी ती ओळ तशीच ठेवली.
अप्पांची प्रतिभा बहरू लागली. ते प्राध्यापक झाले तरी उत्सवात पंढरपूरला येऊन कीर्तने व प्रवचने करू लागले. कीर्तनापूर्वी दादांच्या पाया पडायला गेले की दादांनी सांगायचे ‘अनंता आज हे आख्यान सांग’ व अप्पांनी ते आख्यान सांगायचे.
अप्पांचे कीर्तन म्हणजे वर्क्तृत्व, पांडित्य, नवरस यांचा त्रिवेणी संगम असे व त्यात भक्तीची सरस्वती उसळत असे. पूर्वरंग म्हणजे पाषांड खंडण व संस्कृती मंडण असे. भारतीय संस्कृतीवर निराधार टीका करणार्यावर त्यांचे आसूड पडत असत. त्यांच्या मुखातून ओव्या, अभंग, श्लोक, सुभाषिते, दासगणू महाराजांची पदे यांचा नुसता वर्षाव होत असे. गाण्याच्या साथीला छगनराव बारटक्के, तुकारामबुवा आजेगावकर, मनोहर महाराज कोकलेगावकर यासारखे कसदार गायक असत. त्यामुळे तीनतीन तास कीर्तन रंगत असे व श्रोते भक्तिरसात न्हाऊन निघत. कीर्तनात करुण रसाचा प्रसंग सांगताना अप्पा गहिवरून बोलत. डोळ्यांतून अश्रुधारा वाहात. श्रोतेही भावविभोर होऊन अश्रू पुसत. पंडितराज जगन्नाथाचे आख्यान सांगताना त्यांनी जगन्नाथ व लवंगी यांच्या प्रेमाला दिलेला दिव्यस्पर्श ऐकून ‘पंडितराज जगन्नाथ’ नाटक लिहिणारे विद्याधर गोखले सुद्धा भारावले. व म्हणाले, ‘अप्पा, तुमचे कीर्तन मी अगोदर ऐकले असते तर माझे नाटक वेगळे झाले असते.’
दासगणू महाराजांनी लिहिलेली बावन्न आख्याने व स्वतः लिहिलेली तीन आख्याने त्यांची मुखोद्गत होती. अप्पांची कीर्तने ज्यांनी ऐकली, त्यांनी जन्मोजन्मी बहु पुण्य केले.
काल्याच्या कीर्तनात अप्पा नाचत. खेळ खेळत. त्यावेळी संत नामदेवांच्या ओळी आठवत – “नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ॥” उत्तरकाशीला त्यांनी संन्यासग्रहणापूर्वी जे शेवटचे कीर्तन केले ते ऐकून व पाहून त्यांना ज्यांनी संन्यास दिला, ते स्वामी महामंडलेश्वर विद्यानंदगिरी म्हणाले, “आज कीर्तनात अप्पाजी नाचत होते. खेळत होते. मला असे वाटत होते की साक्षात् भगवान श्रीकृष्ण यमुनेच्या वाळवंटात नाचत आहेत.”
आप्पा कीर्तन करताना स्वतःला विसरून त्या कथेतील प्रसंगाशी एकरूप होत. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप ॥ अशी त्यांची अवस्था होत असे.
अफाट ग्रंथ रचना
अप्पांची ग्रंथसंपदा इतकी अफाट आहे की ती एका जन्मात वाचून होणार नाही. दासगणू महाराजांनी मिरज संस्थानच्या राजांना भगवान श्रीकृष्णावर महाकाव्य लिहून देण्याचे वचन दिले होते; पण वार्धक्यामुळे त्यांन ते शक्य झाले नाही. अप्पा सुट्टीला पंढरपुरी आले, त्यावेळी दादांनी त्यांना आज्ञा केली. ‘हे महाकाव्य तूच लिही व मगच पुण्याला जा’; गुरूची आज्ञा प्रमाण मानून अप्पांनी वयाच्या विशीत ‘श्रीकृष्ण कथामृत’ नावाचे महाकाव्य लिहिले त्याला गुरुदेव रानडे यांनी प्रस्तावना लिहिली. मराठीत असे सुंदर, अलंकारिक भाषावैभव असणारे दुसरे महाकाव्य नाही.
त्यांनी ‘शककर्ता शालिवाहन’ यांच्या चरित्रावरही महाकाव्य लिहिण्यास आरंभ केला पण ते अपूर्ण राहिले. पंधरा सर्ग लिहिले ते वाचून सावरकरांच्या ‘कमला’ काव्याची आठवण होते इतके ते भावमधुर, रसपूर्ण आहे. ते महाकाव्य नंतर नांदेडचे संस्कृत कवी खंदे गुरुजी यांनी पूर्ण केले. अर्थात् अप्पांशी चर्चा करूनच. मराठीत महाकाव्य लिहिणारे कवी अत्यल्प आहेत.
अप्पांनी ब्रह्मसूत्रे, अकरा उपनिषदे व गीता यावर मराठीत भाष्ये लिहिली या प्रस्थानत्रयीवर जे भाष्य लिहितात त्यांनाच आचार्य म्हणतात. म्हणून ते खरे आचार्य होते. त्यांनी ज्ञानेश्वरीचा प्रचलित मराठी भाषेत अनुवाद केला. तो ‘अनुवाद ज्ञानेश्वरी’ होय. ज्ञानेश्वर महाराजांची भाषा सातशे वर्षे जुनी असल्याने सध्याच्या लोकांना कळत नाही. म्हणून त्याचा प्रचलित मराठी भाषेत अनुवाद केला.
त्यांचे प्रकाशित ग्रंथ 47 आहेत. त्यातील काही ग्रंथांचा उल्लेख करतो. महाभारतावरील आक्षेपाचे खंडण करणारा ‘महाभारताचे वास्तव दर्शन’ हा त्यांचा ग्रंथ फारच गाजला. त्यावर त्यांनी महाराष्ट्रभर व्याख्याने दिली.
संतकवी दासगणू महाराजांचे वाङ्मय संपादन करून दहा खंडात प्रकाशित केले. समर्थ रामदासांच्या ‘मनाचे श्लोकां’चे विवरण करणारा ‘मनोबोध’ ग्रंथ लिहिला. त्यावर चातुर्मासात पंढरीत प्रतिदिन प्रवचने केली.
‘संतकवी दासगणू महाराज व्यक्ति आणि वाङ्मय’ या ग्रंथात दासगणू महाराजांचे चरित्र व त्यांच्या वाङ्मयाचे समालोचन केले व त्यात संतसाहित्य म्हणजे ‘मातृसंमित उपदेश’ हा नवा साहित्यविचार मांडला.
‘भगवान श्रीकृष्ण एक दर्शन’ या ग्रंथात भगवान श्रीकृष्णाच्या राजनीतीचे दर्शन घडविले ते फारच मननीय व आजच्या काळाला सुसंगत आहे.
त्यांनी संन्यास घेतल्यावर उत्तरकाशी येथे ‘मनुस्मृति’ (सार्थ, सभाष्य) हा 800 पानांचा ग्रंथराज लिहिला. मनुस्मृतीवर त्यांनी पंढरपुरात अभ्यासवर्ग घेतला. मनुस्मृतीवर लिहिणे म्हणजे अग्नीत हात घालणे होते. पण ते अग्निदिव्य अप्पांनी केले. ह्या ग्रंथावर पुण्यात परिसंवाद घेतला. ही त्यांची निर्भयता गीतेतील ‘अभयं’ ही दैवीसंपत्ती होती.
अप्पांनी विविध अशा दहा ग्रंथांना अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिल्या. विविध विषयावर बावीस लेख लिहिले. त्यात कालिदास नि भावगीते, प्राचीन व अर्वाचीन शृंगार नि वैषयिकता, श्रीमद् भगवद्गीता भारताचे ठिगळ की हृदय (माटे यांच्या लेखाला उत्तर), नरकात गेला तो लेखकाचा मनोरथ, अर्जुनाचा नाही (डिंगरे यांच्या लेखाला उत्तर) महाभारताचे मारेकरी असा लेखही लिहिला.
त्यांनी सहा ग्रंथांचे अनुवाद केले. त्यात मेघदूताचीही समश्लोक केली; पण ती अपूर्ण आहे. याशिवाय स्वतंत्र काव्यरचना श्रीराम कथामृत, बालकांड व श्री गुरुबोध समश्लोकी, संस्कृत सुभाषितांची समश्लोकी केली.
त्यांचा ‘राष्ट्र संरक्षण पोवाडा’ तर राजकीय, सामाजिक, राजकारण, राष्ट्रकारण याचा परखड व जहाल शब्दात घेतलेला समाचार आहे. त्यावर मी पुस्तक लिहिले आहे.
अप्पांनी देवदेवतांची व संतांची अनेक संस्कृत व मराठी स्तोत्रे लिहिली. ती प्रासादिक व नादमधुर आहेत. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, रामदास, गजानन महाराज या संतांची त्यांनी लिहिलेली संस्कृत स्तोत्रे आमच्या नित्यपठणात आहेत. नामदेव भक्त श्री. प्रकाश निकते यांनी त्यांना संत नामदेवांचे संस्कृत स्तोत्र लिहा म्हणून आग्रह केला. अप्पांनी तत्क्षणी ‘घें लिहून’ म्हटले व ते स्तोत्र तत्क्षणी सांगितले व निकते यांनी लिहिले. अप्पांची प्रतिभा इतकी स्वाभाविक होती की बोलण्याप्रमाणे काव्य त्यांच्या मुखातून स्रवत होते. ‘भावार्चना’ या त्यांच्या पुस्तकात त्यांची संस्कृत व मराठी स्तोत्रे ग्रथित केली आहेत.
अप्पांची साहित्य संपदा अफाट आहे. त्यावर स्वतंत्र लेख लिहावा लागेल. अप्पा आयुर्वेद विशारद होते. त्यांनी ‘आयुर्वेदिय व्याधिविनिश्चय’ व ‘अष्टांग संग्रह’ हे दोन ग्रंथ लिहिले. ते आयुर्वेद महाविद्यालयात अभ्यासाला आहेत.
दासगणू प्रतिष्ठानची निर्मिती
दासगणू महाराज यांच्या निधनानंतर त्यांचे कार्य चालविण्यासाठी अप्पांनी आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाचा राजीनामा दिला व पूर्णवेळ दासगणू महाराजांच्या कार्याला वाहून घेतले. नांदेड जिल्ह्यात उमरी गावाजवळ गोरटे येथे त्यांनी दासगणू महाराजांचे भव्य असे समाधिमंदिर बांधले. तेथे दासगणू महाराजांची वस्त्रसमाधी आहे. महाराजांनी सुरू केलेले सर्व उत्सव तेथे भव्य प्रमाणात साजरे होतात. ते एक उपासना केंद्र व्हावे, यात्रेचे सहलीचे ठिकाण होऊ नये याची अप्पांनी पूर्ण काळजी घेतली. मंदिरात होणारे नित्य व नैमित्तिक उपचार, उत्सवाचे स्वरूप या सर्वांची अप्पांनी लिखित घटना लिहून ठेवली आहे. या मंदिराच्या प्राकारात श्रीविठ्ठलरुक्मिणी मंदिर व शनि मंदिर आहे. अप्पांनी संग्रह केलेल्या मौलिक पुस्तकांचे ग्रंथालय आहे. अप्पांच्या खोलीत त्यांची प्रतिमा व ध्यानमंदिर आहे. वरच्या मजल्यावर वरदनारायणाचे अत्यंत सुंदर चित्र व ध्यानमंदिर आहे. तिथे प्रातःकाळी भाविक ध्यान करून प्रार्थना म्हणतात. अप्पांच्या फोटोंचे एक उत्कृष्ट प्रदर्शन पहिल्या मजल्यावर आहे. ते पाहताना अप्पांचा जीवनपट डोळ्यापुढे उभा राहतो.
गोरटे येथे आयुर्वेद औषधालय आहे. गोशाळा आहे. वर्षात दासगणू जयंती, स्वामी वरदानंद भारती पुण्यतिथी, अनंतरावांचा जन्मदिवस, अनंतचतुर्दशी, रामनवमी, गोकुळ अष्टमी असे चौदा विविध उत्सव प्रतिवर्षी साजरे केले जातात. वर्षभर अनेक ठिकाणी उत्सव, शिबिरे, पदयात्रा, कीर्तन महोत्सव साजरे केले जातात. अप्पांनी या संस्थानची निर्मिती करून त्यावर कळस चढविला.
पंढरपूरच्या दामोदर आश्रमात कार्तिक वद्य 10 ते 14 ज्ञानेश्वर पुण्यतिथी उत्सव व दासगणू पुण्यतिथी उत्सव साजरा होतो.
अप्पांनी संतविद्या प्रबोधिनी व श्री राधा दामोदर प्रतिष्ठान अशा दोन संस्था स्थापन केल्या. त्यामार्फत शिबिरे, पारायणे, चर्चा, परिसंवाद, गृहस्थोपयोगी वैदिक शिक्षण, वैयक्तिक साधना मार्गदर्शन, संस्कार केंद्र चालविणे हे कार्य केले जाते. या संस्थेतर्फे श्रीदासगणू यांच्या पुण्यस्मरणार्थ प्राचीन हिंदु परंपरेचे संरक्षण, संवर्धन, प्रसार हे कार्य करणार्या व्यक्तीस वा संस्थेस त्याच्या ग्रंथासाठी, कार्यासाठी, नियतकालिकास हा एक लक्ष रुपयांचा पुरस्कार देण्याची प्रथा अप्पांनी सुरू केली. तसेच पुणे व लातुर विभागात शालान्त परीक्षेत संस्कृत विषयात प्रथम येणार्या विद्यार्थ्यास 5000/- रु.चे पारितोषिक देण्यात येते.
त्यांनी स्थापन केलेल्या श्रीराधादामोदर प्रतिष्ठानतर्फे अध्यात्मविषयक सर्व धर्म-कल्पनांचा समन्वय करणे. त्या अनुषंगाने ग्रंथलेखन-संपादन, संशोधन करणे त्याला पोषक असे परिसंवाद चर्चासत्र, पारायणे, व्याख्याने आयोजित करणे, आयुर्वेदाचा प्रसार करणे हे कार्य केल्या जाते.
श्रीमद् सद्गुरू दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे, श्री राधादामोदर प्रतिष्ठान पुणे, श्री संतविद्याप्रबोधिनी या अप्पांनी निर्माण केलेल्या संस्था आजही एकत्र कार्य करीत आहेत.
कर्तृत्वाचा महामेरु
अप्पांचा गृहस्थाश्रम सुखी संपन्न होता.
सानन्दं सदनं सुताश्च सुधियः कान्ता अनुसारिणी ।
सन्मित्रं सुधनं स्व-कर्मणि इतिः आज्ञापराः सेवकाः ।
आतिथ्यं गुरुपूजनं प्रतिदिनं मिष्टान्नपानं गृहे ।
साधोः संगमुपासते हि सततं धन्यो गृहस्थाश्रमः ।
घरात आनंदी आनंद, आनन्दाचे डोही आनंद तरंग. मुले बुद्धिमान. शेखर, महेश दोघेही पुत्र उच्चविद्या विभूषित व कर्तृत्ववान. पत्नी सौ. इंदिरा म्हणजे साक्षात् गृहलक्ष्मी. पतीचे अनुसरण करणारी महान पतिव्रता. सन्मित्र. किती नावे द्यावीत ? पू. पांडुरंग शास्त्री आठवले, प.पू. गोळवलकर गुरुजी, दत्तोपंत ठेंगडी, डोंगरे महाराज, किशोरजी व्यास, बाबासाहेब गोरटेकर वगैरे अनेक. सन्मार्गाने येणारे धन. कीर्तन, प्रवचन, व्याख्यान या साठी मानधन मागितले नाही. न मागता येईल ते स्वीकारले. स्वतःच्या कार्यात रममाण झालेले. कोणते कार्य ? दासगणू महाराजांच्या साहित्याचा प्रसार, कीर्तन, प्रवचन, व्याख्यान, ग्रंथलेखन, पाषांडखंडण, यात मग्न. अप्पांचे सेवक छगनकाका, रामभाऊ अदवानकर, गार्गी त्यांच्या आज्ञेत तत्पर होते.
अप्पांच्या घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत आम्ही समक्ष पाहिले आहे. संतांची ते पूजा करीत. पू. पांडुरंग शास्त्री आठवले, धुंडा महाराज, डोंगरे महाराज यांचा अप्पांनी केलेला सत्कार आम्ही पाहिला आहे. त्यांचे सद्गुरू दासगणू महाराज यांचे पूजन ते प्रत्यक्ष व मानसिक अहोरात्र करीत होते. अप्पांच्या घरचे भोजन तर इतके सुग्रास की त्यांच्या आमंत्रणाची आम्ही सारे वाट पाहात असू. अप्पांना साधूंची संगती जन्मापासून लाभली. हिमालयात भ्रमण करतांना अनेक साधूंची त्यांची गाठ पडली व संगती झाली. असा त्यांचा गृहस्थाश्रम धन्य होता.
अप्पांची देवभक्ती व देशभक्ती प्रखर होती. ज्या सिंधुजलाची सावरकरांना ओढ लागली होती. त्या सिंधूचे त्यांनी दोनदा स्नान केले. मानससरोवराची यात्रा केली. सावरकरांविषयी अप्पांना नितान्त प्रेम होते. पंढरपूरच्या सावरकर प्रेमी मंडळाला अप्पांच्या विनंतीवरूनच आगाशे बंधूनी जागा दिली. तिथे एक कोटी रुपचे खर्च करून सावरकर क्रांति मंदिर उभे राहिले आहे. सावरकरांचे ‘कमला’ काव्य अप्पांना मुखोद्गत होते. पंढरपूरच्या पहिल्या सावरकर साहित्य संमेलनात अप्पा समारोपाचे वक्ते होते. त्यांच्या ओजस्वी वाणीने बाळाराव सावरकर, विद्याधर गोखले प्रभावित झाले.
त्यांचे सांसारिक व पारमार्थिक जीवन एकरस होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात इंद्रधनुष्याप्रमाणे खालील विलोभनीय सप्त रंग होते.
- वेदप्रणित समग्र समतोल जीवन,
- अनन्य अभंग गुरुनिष्ठा,
- रसरसलेले माणूसपण,
- भगवंताचे रसाळ गुणगान,
- सांस्कृतिक चरित्रांचे वास्तवदर्शन,
- प्राचीन विचारांचे सम्यक् प्रतिपादन,
- राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी अचूक मार्गदर्शन.
समर्थ रामदासांच्या शब्दांना स्मरून अप्पांचे वर्णन करायचे झाल्यास असे करता येईल.
अध्यात्माचा महामेरु । राष्ट्र विचारांचा जागरु ।
अखंड संतविचारांचा विचारु । विरक्त योगी ॥
अप्पांनी अध्यात्म उपासले, आचरले, सांगितले. सदैव राष्ट्रविचारांचे, हिंदुत्वाचे चिंतन केले, प्रसार केला. संतविचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी कीर्तने, प्रवचने, व्याख्याने, पारायणे, शिबिरे घेतली. शेवटी सर्वसंग परित्याग करून संन्यास घेऊन हिमालयात उत्तरकाशी येथे जाऊन गंगेच्या काठी जीवन व्यतीत करून संजीवन समाधी घेतली.
साक्षात्कारी संत
अप्पांना हिमालयात वरदनारायणाचे दर्शन झाले. त्याचे त्यांच्या काव्यात वर्णन आहे. त्यांच्या वरदनारायण स्तोत्रात त्यांना झालेल्या साक्षात्काराचे वर्णन आहे.
प्रेम्णा स्वभक्तजनवांछितपूरणाय । संदर्शितात्यवपुषे नतवत्सलाय ॥
स्निग्धप्रसन्नहसिताय हितोत्तमाय । नारायणाय बदरीपतये नमोऽस्तु ॥
स्पर्शेन दिव्यमृदुना करनीरजस्य । संवर्धकाय चरणानतभाग्यराशेः ।
संजीवकाय जनकाय च पालकाय । नारायणाय बदरीपतये नमोऽस्तु ॥
स्वतःच्या भक्तजनांची इच्छा पूर्ण करण्यासाठी चरणी नत झालेल्या लाडक्याला प्रेमाने आपले शरीर दाखविले. ज्याचे हास्य प्रे्रमळ व प्रसन्न आहे, त्या बदरीपती नारायणाला नमस्कार असो. त्यांच्या दिव्य, मृदु हस्तकमलाच्या स्पर्शाने चरणावर नत झालेल्याची भाग्यराशी वाढविणार्या संजीवन देणार्या, जनक निर्माता, पालक अशा बदरीपती नारायणाला नमस्कार असो. यात त्यांना वरदनारायणानी आपले रूप दाखविले व हस्तकमलानी स्पर्श केला. असे वर्णन आहे. अप्पांनी त्यांना वरदनारायणाचे जे दर्शन झाले त्याचे चित्र चित्रकार श्री. कल्याण शेटे यांच्याकडून तयार करवून घेतले. ते गोरटे, नांदेड, पुणे व जिथे जिथे अप्पांचे भक्त आहेत, तिथे आहे.
इतर काही त्यांच्या काव्यातून त्यांना साक्षात्कार घडण्याचे उल्लेख आहेत.
शतपैलू व्यक्तिमत्त्वाचा किती वेध घ्यावा ?
त्याच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या स्मृतीला शतशः वंदन !
स्मरणहि तव संजीवन आम्हा । तव तेजातील अंश दे ।
कार्य चालवू पुढे निरंतर । सेवेचे वरदानही दे ॥
भागवताचार्य श्री. वा. ना. उत्पात
पंढरपूर. भ्र. 9422647507