प्रज्ञालोक – विहंगमावलोकन

प्रज्ञालोकचे प्रेरणास्थान व पूर्व संपादक

aprabuddha
कै. प. पू. अप्रबुद्ध

पू. अप्रबुद्ध – वैदिकधर्म प्रसारकाचे कार्य पूर्ण जीवनभर केवळ व्रत म्हणून, ब्रह्मचर्याश्रमातच राहून अकिंचन व व्यक्तित्वलोपाचीच साधना साधून करणारे गेल्या शतकातील तपस्वी व्यक्तिमत्व म्हणून पू. अप्रबुद्धांचा उल्लेख करावा लागेल. हिमालयात तीन वेळा तपश्‍चर्येला जाऊन तिथे त्यांना श्रीगुरू कृपेने वैदिक धर्माची जी रहस्ये समजली व उलगडली तिचाच प्रसार व प्रचार करण्यासाठी श्रीगुरूंच्या आज्ञेनेच ते नागपूरात आले. नागपूरला आल्यानंतर अ. भा. वर्णाश्रम स्वराज्य संघाचे ते अध्यक्ष झाले. त्यानिमित्त त्यांनी देशभर दौरे करून वैदिक राष्ट्रीय भूमिकेचा प्रसार केला. त्यावेळी पक्षाचे मुखपत्र म्हणून “धर्मवीर” हे साप्ताहिक त्यांनी सुरू केले. त्या साप्ताहिकाचे प्रधान संपादक स्वतः अप्रबुद्धच होते. अनेक गाजलेले लेख व वादविवाद ह्या साप्ताहिकातून झाले. पुढे वर्णाश्रम स्वराज्य संघ बंद पडला व धर्मवीर साप्ताहिकही संपले. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी प्रवचने व्याख्याने इत्यादीद्वारा त्यांचा धर्मप्रसार सुरूच होता. त्यांच्याभोवती डॉ. दि. का. गर्दे (राज्यशास्त्र विभागप्रमुख, पुणे विद्यापीठ) प्रा. भा. ह. मुंजे (अर्थशास्त्राचे प्रसिद्ध लेखक व नागपूर विद्यापीठ अर्थशास्त्र विभागप्रमुख) डॉ. ब. स. येरकुंटवार (सव्यसाची विद्वान् व प्रहारी लेखक) इत्यादी मंडळी शिष्यवत जमली होती.

वैदिक विचारांची मुस्कटदाबी होत आहे म्हणून आपल्या मत-प्रसाराकरिता इ. स. 1958 साली त्यांनी ‘प्रज्ञालोक’ हे त्रैमासिक सुरू केले. अगदी प्रारंभापासून डॉ. ब. स. येरकुंटवार हे प्रधान संपादक होते. ‘प्रज्ञालोक’ सुरू झाल्यानंतर प्रारंभीचे नऊ वर्षे पू. अप्रबुद्ध जीवित होते. त्यांनीही ‘प्रज्ञालोक’मधून लेखन केले. विशेषतः ‘धार्मिक शंका समाधान’ हे सदर पू. अप्रबुद्धांमुळेच सुरू झाले व चांगले चालले. 9 जुलै 1967 रोजी पू. अप्रबुद्धांचे देहावसान झाले. पुढे डॉ. येरकुंटवारांनी ही धुरा समर्थपणे सांभाळली.

dr.bs-yerkuntwar
डॉ. ब. स. येरकुंटवार

डॉ. ब. स. येरकुंटवार – महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर डॉ. येरकुंटवार भारतीय शास्त्रांच्या मूलभूत अभ्यासाकरिता पंडित सम्राट कृष्णशास्त्री घुले (नागपूर) यांचेकडे जात असत. प्रसिद्ध विद्वान् म. म. (कै.) बाळशास्त्री हरदास देखील पं. कृष्णशास्त्रींचेच विद्यार्थी ! 1934 साली अप्रबुद्धांचे नागपूरला आगमन झाल्यानंतर पं. कृष्णशास्त्रींनी हे दोन विद्यार्थी, डॉ. येरकुंटवार व बाळशास्त्री यांना अप्रबुद्धांच्या स्वाधीन केले. त्यावेळी ते म्हणाले “हे दोन हिरे आहेत. यांना पैलू पाडून प्रकाशित करण्याकरिता तुमचे स्वाधीन करीत आहे. अप्रबुद्धांनी दोघांचाही पत्कर घेतला. त्यांच्या तालमीतच अनेक विषयांचा व्यासंग व लेखन यांत येरकुंटवार तयार झाले. त्यांनी ‘प्रज्ञालोक’ची संपादकीय धुरा 1958 ते 1995 अशी 39 वर्षे सांभाळली. त्यांच्याबद्दल एकाच वाक्यात सांगायचे म्हणजे पंडितराज जगन्नाथांच्या “तर्केषु कर्कषधिऽयो वयमेव नान्ये । काव्येषु कोमलधियो वयमेव नान्ये”. अनेक गाजलेले लेख लिहून प्रज्ञालोकला एक प्रतिष्ठा, विशिष्ट विचारसरणीचा वाचक वर्ग व एक परिभाषा निर्माण करून 1995 साली डॉ. येरकुंटवारांनी जगाचा निरोप घेतला. ‘प्रज्ञालोक’चा सांस्कृतिक व आध्यात्मिक दर्जा सांभाळीत असतांना त्यांना विशेष सहकार्य लाभले ते म्हणजे श्री. विठ्ठलराव गोखले यांचे. एक अत्यंत अभ्यासू, श्रद्धावान् व निःस्वार्थीपणाने कार्य करणारे ते अप्रबुद्धांचे एकनिष्ठ भक्त होते. त्यानंतर डॉ. गु. वा. पिंपळापुरे हे प्रज्ञालोकचे संपादक झाले.

dr.gv-pimplapure
कै. डॉ. गु. वा. पिंपळापुरे
bm-vartak
कै. श्री. भालचंद्र वर्तक

डॉ. गु. वा. पिंपळापुरे – संस्कृत विषयाचे प्राध्यापक असणारे डॉ. पिंपळापुरे यांनी प्रज्ञालोकची धुरा त्यांच्या आयुष्यभर 1995 ते 2005 पर्यंत सांभाळली. शास्त्रांचा मूलभूत अभ्यास, दत्तसंप्रदायाची दृढ उपासनेची बैठक व दार्शनिक मांडणी ही डॉ. पिंपळापुरेंची वैशिष्ट्ये होती. त्यांच्यातील प्रसिद्धीपराङ्मुखता व आत्मविलोपि व्यक्तित्व यांच्यामुळे प्रज्ञालोकला वेगळीच चमक लाभली.

त्यांच्या मृत्युनंतर 2005 पासून प्रधान संपादकाची धुरा श्री. श्रीश हळदे सांभाळत आहेत. प्रा. डॉ. म. रा. जोशी, प्रा. प्र. गं. बोरावार हे संपादक मंडळात आहेत.

कै. श्री. भालचंद्र वर्तक हे अत्यंत विद्वान् व दांडगी स्मरणशक्ति असलेले व्यक्तिमत्व. प्रज्ञालोकचे संपूर्ण यश त्यांच्या कार्यशक्तीमुळेच आहे. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे वानप्रस्थ जीवन त्यांनी प्रज्ञालोकसाठी समर्पित केले. सर्व व्यावहारिक बाजू (कारण तीच मुख्य आहे) कै. भा. म. वर्तक यांनी यशस्वीपणे सांभाळली म्हणून आजपर्यंत हा गाडा चालत आलेला आहे.

गेली 61 वर्षे अखंड सेवा देणारे हे नियतकालिक ह्याचे मुद्रण करणारेही पहिल्यापासून एकच आहेत हा एक अलौकिक संगम आहे. प्रज्ञालोकच्या मुद्रणाची संपूर्ण धुरा नारायण मुद्रणालयाचे आधारस्तंभ कै. श्री. पांडुरंग नारायण बनहट्टी ह्यांनी सांभाळली. ही साधना त्यांनी पिढीजात सुरू ठेवली आहे. दुसर्‍या पिढीतील कै. श्री. मधुसूदन, श्री. श्रीकृष्ण बनहट्टी व आता तिसर्‍या पिढीतील श्री. मंदार व भूषण बनहट्टी ही जबाबदारी समर्थपणे सांभाळीत आहेत.

प्रज्ञालोकची वाटचाल व पुढील दिशा

आज प्रज्ञालोक 60 वर्षे पूर्ण करून 61 व्या वर्षात पहिले पाऊल टाकीत आहे. वेळोवेळी या ‘प्रज्ञालोक’च्या प्रवासाबद्दल आश्‍चर्य प्रकट केलेच आहे. केवळ सांस्कृतिक, वैदिक, राष्ट्रीय विषय घेऊन, करमणूक करणार्‍या विषयांना फाटा देऊन, कोणतेही अनुदान नाही की सवलत नाही; एवढेच काय पण आहे त्या रीतीप्रमाणे जाहिरातीचे उत्पन्न देखील नाकारून ‘प्रज्ञालोक’सारखे सांस्कृतिक स्फुरण चालावे ही खरोखरच ईश्‍वरी लीला व कृपा आहे. अनेक अज्ञात हात, अनेक अज्ञात शक्ती, वेळेवर धाऊन येतात व हे कार्य पुढे चालते. व्यक्तिशः ही प्रधान संपादकीय धुरा सांभाळण्यास मला बारा वर्षांहून अधिक काळ झाला. याचाच अनुभव व त्यावेळेसचे चिंतन केल्यास “ही केवळ ईश्‍वरी कृपा” याशिवाय दुसरे शब्द नाहीत. किती नांवे घ्यावीत, ज्यांचा कधी प्रत्यक्ष तर दूरच पण अप्रत्यक्ष देखील या कार्याशी संबंध नाही, अशा व्यक्ती वेळेवर पाठीशी उभ्या राहिल्या व प्रज्ञालोकचे प्रकाशन सुरू राहिले ! प. पू. डॉ. हेडगेवार यांच्या जन्मशताब्दि कार्यक्रमानंतर रा. स्व. संघाने वेगवेगळे प्रकल्प सुरू केले.

त्यावेळी सरसंघचालक पू. बाळासाहेब देवरस म्हणाले होते, “तुम्ही कार्य व कार्यक्रम दाखवा ! पैसा लगेच उभा होतो !” आणि काय आश्‍चर्य ! रा. स्व. संघाने सुरू केलेले वनवासी कल्याणाश्रम, सरस्वती शिशु मंदीर, संस्कृत भारती प्रभृति अनेक उपक्रम पूर्ण देशात सुरू असून कुठेही पैशाअभावी रखडले नाहीत. अट एकच, तनुनिर्वाहा पुरते घेऊन राष्ट्रकार्यात झोकून देणारी कार्यकर्त्यांची फळी ! ती असल्यावर समाजातून ‘श्रीखंडी’ कावड येऊन रांजण कसा भरतो व कार्य सुरू राहते हेही कळत नाही.

‘कालनिर्णय’चे कै. श्री. जयंत साळगावकर यांनी पत्र पाठवून प्रज्ञालोकच्या संपादकीयांची तारीफ करून रु. 5000/- पाठविले. सनातन प्रभातचे डॉ. जयंत आठवले यांनीही तशीच मदत केली. प्रज्ञालोक त्रैमासिक स्वरूप बदलून द्वैमासिक स्वरूपांत सुरू झाला हे कळल्याबरोबर नागपुुरातील प्रसिद्ध विधिज्ञ व महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता अ‍ॅड्. व्ही. आर. मनोहर यांनी अगदी बिनबोभाटपणाने रु. 25000/- ची मदत दिली ! ही ठळक आठवणारी उदाहरणे झाली. भूतपूर्व अधिष्ठाता डॉ. देशकरांसारखे पक्षाघाताने बिछान्यावर खिळून असणारे, उजवा हात निकामी झाला असता, निवृत्तीनंतर डाव्या हाताने लिहिण्याचा सराव करून ‘प्रज्ञालोक’साठी लिहिणारे व आपल्या निवृत्तिवेतनातून हजार दोन हजार अशी मदत पाठविणारे प्रज्ञालोकचे पाठीराखे आठविल्यावर आजही ऊर भरून येतो व शब्द संपून निःशब्दता येते लेखणीला!

परवा मी आपल्या गावी असता नागपूरला घरी एक नव्वदीच्या घरांत वय असणारे गृहस्थ, घर धुंडाळत आले. आमच्या सौभाग्यवतींनी त्यांना विचारपूस व आतिथ्य करून येण्याचे कारण विचारले. त्यांनी सांगितले की डॉ. येरकुंटवारांचे माझेवर खूप उपकार आहेत. त्यांच्या ऋणाची आंशिक फेड करण्याकरिता मी ही फुलाची पाकळी देत आहे, प्रज्ञालोकसाठी ! म्हणून रु. 3000/- त्यांनी स्वाधीन केले. याबद्दल मला रसीद नको, (म्हटले तरी हिशेबात असणारच) उल्लेखही नको व त्याबद्दल प्रज्ञालोकचा अंकही पाठवू नका ! माझ्या पुतण्याकडे येतो; तो मी वाचतोच. फक्त डॉ. येरकुंटवार व पू. अप्रबुद्ध यांच्या स्मरणार्थ ही फुलाची पाकळी समजा ! अशा दात्यांपुढे काय बोलणार ? अशीच सद्भावना सुप्रसिद्ध शल्य तज्ज्ञाने श्री. वर्तक यांना स्वतःचे घरी बोलावून एकवीस सहस्रचा धनादेश देऊन व्यक्त केली. ‘प्रज्ञालोक’च्या दर अंकात आवरण पृष्ठावरील विनंतीला प्रतिसाद देत सोलापुरचे श्री. अजोतिकर, पुण्याचे श्री. घळसासी, नागपूरचे शास्त्री असे जुने आजीव सदस्यही सहाय्याला आहेतच. अनेक हाताने परमेश्‍वरच हा गाडा चालवीत आहे, हे लक्षांत येते.

लिहिण्याच्या बाबतीतही तेच ! आळंदी समाधिस्त श्री नरसिंव्ह सरस्वती स्वामी महाराज, ब्रह्मर्षि अण्णासाहेब पटवर्धन व पू. अण्णा (अप्रबुद्ध) यांचे स्मरण करून लेखणी हाती घेतली की, ती स्वतःच लिहिते. एकही संदर्भ पाहण्याचा कधी साडेबारा वर्षात प्रसंग आला नाही ! ही ईश्‍वरी कृपा अनुभवास आल्यावरूनच ठामपणे सांगता येतं , “प्रज्ञालोक हे ईश्‍वरी कार्य आहे.”