समग्र अप्रबुद्ध (प्रवर-1)
‘समग्र अप्रबुद्ध’चा प्रथम खंड नुकताच माझ्या वाचनात आला. यापूर्वी मी अप्रबुद्धांची ‘सौन्दर्यलहरी’ आणि ‘वेदांचे अपौरुषेयत्व’ ही दोनच पुस्तके वाचली होती आणि त्यामुळेच त्यांचे इतरही लिखाण वाचण्याची विलक्षण ओढ मनाला लागली होती. हा अप्रतिम खंड प्रकाशित केल्याबद्दल मी प्रथम ‘प्रज्ञालोक अभ्यास मंडळा’ला धन्यवाद देते.
प्रस्तुत खंडाच्या मनोगतात सांगितले आहे की, एकूण तीन खंडात ‘समग्र अप्रबुद्ध’ प्रसिद्ध करण्याचा मंडळाचा मानस आहे. त्यांच्या या पवित्र पण दुर्घट (अप्रबुद्धांचे काही ग्रंथ अनुपलब्ध असल्यामुळे) संकल्पाला सिद्धी लाभो, अशी परमेश्वरास प्रार्थना करते.
पूजनीय अप्रबुद्ध (विष्णू केशव पाळेकर) यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे 31-12-1887 ला झाला. शिक्षण अमरावती, नागपूर आणि काशी विश्वविद्यालयात झाले. विद्यार्थिदशेतच त्यांना ब्रह्मर्षी अण्णासाहेब पटवर्धनांचा वरदहस्त लाभला आणि 1917 ते 1933 या कालखंडात हिमालयाची तीन वेळा यात्रा करून त्यांनी एकान्तसाधना केली. त्यानंतर मात्र वैदिक संस्कृती, अध्यात्माधिष्ठित राष्ट्रधर्म यांसारख्या विषयांवर लिहून भगवत्सेवा करण्यासाठी त्यांनी नागपूरलाच आपले कार्यक्षेत्र बनविले. खरेतर हे ‘सारस्वती जन्मभू’ असणाऱ्या विदर्भाचे भाग्य! पण, त्यांच्या हयातीत त्यांचे साहित्य जितक्या प्रमाणात समाजापुढे यायला हवे होते तितक्या प्रमाणात ते आले नाही. हे अवघ्या महाराष्ट्राचेच दुर्भाग्य!
प्रस्तुत खंडाचा प्रारंभ गणेश अथर्वशीर्षविषयक लेखाने झालेला आहे. वस्तुत: हा लेख कालक्रमानुसार इतर लेखांच्या नंतरचा. तरीही गणेशाला अग्रक्रम दिल्यामुळे अप्रबुद्धांनी साक्षेपाने प्रतिपादित केलेल्या वैदिक संस्कृतीचा मान राखला गेला आहे. या लेखात गणेशस्वरूपाचा तात्त्विक दृष्टीने विचार आहे. विशेषत: ‘मूल भगवत्तत्त्व हे जरी शक्तिकेन्द्र असले, तरी तो विद्युत्प्रवाह स्वत: घरी पोचण्यासाठी ‘भगवन्मूर्ती’ हा स्विच असावा लागतो आणि मूर्तिपूजा म्हणजेच त्या शक्तिकेन्द्राशी स्वत:ला जोडणे. हा दृष्टान्त तर आजच्या यंत्रयुयीन युवकालाही पटण्याजोगा आहे. तत्त्वचर्चेसारखा गहन विषय येथे सुलभ करून सांगितला आहे.
वाराणसीच्या सांग-वेद-विद्यालयाच्या पं. गणेश्वरशास्त्री द्राविडांनी प्राक्कथनाच्या रूपात केलेले अप्रबुद्धांचे अभिनंदन हे याचेच द्योतक आहे.
यानंतरचे दोन बृहत्काय ग्रंथ म्हणजे ‘वैदिक संस्कृतिमाले’तील दोन टवटवीत पुष्पे! ही माला वैदिक संस्कृतीचे खरे स्वरूप विशद करण्यासाठीच गुंफली आहे, असे स्वत: अप्रबुद्धांनी लिहिले आहे (पृ. 319). या मालिकेतील पहिले पुष्प म्हणजे ‘ब्रह्मर्षी अण्णासाहेब पटवर्धन’ या चरित्रात्मक ग्रंथाला ‘संतांच्या मांदियाळी’त वावरणाऱ्या दादासाहेब खापर्डे यांचे पुरोवाक् लाभले आहे. बुद्धिगम्य आणि तत्त्वनिष्ठ लिखाणही श्रद्धायुक्त अंत:करणाने कसे भावस्निग्ध करता येऊ शकते, याचा आदर्श म्हणजे प्रस्तुत चरित्र. अण्णासाहेबांच्या अलौकिक अध्यात्मनिष्ठेबरोबरच त्यांची विलक्षण बुद्धिमत्ता, स्मृतिग्रंथाचे व त्याचबरोबर वैद्यकीचे ज्ञान, राष्ट्रीय शिक्षणाबद्दलचे त्यांचे विचार, सुराज्यापेक्षा स्वराज्यच कसे महत्त्वाचे याविषयीचे त्यांचे चिंतन, स्वतंत्र विदर्भासाठी केलेले प्रयत्न, सालारजंग प्रकरण इ. सर्व लौकिक तपशीलही अत्यंत सुश्लिष्टपणे येथे अंकित केले आहेत.
वैदिक संस्कृतिमालेतील दुसरे पुष्प म्हणजे ‘वैदिक संस्कृतीची पुनर्घटना.’ हा साधकबाधक चर्चा असलेला एक सर्वंकष आणि विचारप्रवर्तक ग्रंथ. मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीमुळे आज हिंदू हाडमांस, पण त्यात ‘बांडगुळी’ अंत:करण, अशी प्रजा दिसत आहे. ही त्यांची आंतरिक खंत. संस्कृती आणि सभ्यता यातला नेका फरक अप्रबुद्धांनी खुसखुशीत विनोदी टोणे मारून (पृ. 327 ते 329) स्पष्ट केला आहे. तलवार हाच मुस्लिमांचा मुत्सद्दीपणा आणि मुत्सद्दीपणा हीच इंग्रजांची तलवार (पृ. 328) असल्यामुळे आणि हिंदू संघटना तितक्या सक्षम नसल्यामुळे वैदिक संस्कृतीची पुनर्घटना आवश्यक असल्याचे त्यांनी ठासून प्रतिपादन केले आहे. ‘अधिकार’ प्रकरणात त्यांनी मत प्रदर्शित केले आहे की पुढारी, त्यांचे अनुयायी व इतर बाजारबुणगे असे येथील व्यक्तींचे तीन वर्ग आहेत आणि राष्ट्रीयत्वाच्या दृष्टीने तिन्ही कुचकामीच! माणसाचे माणूसपण तत्त्वनिष्ठेतच, हे त्यांनी समर्थपणे स्थापित केले आहे.
पुढे ‘चातुर्वर्ण्य व वेदमार्ग’ या प्रकरणात चातुर्वर्ण्याचा व जातिसंस्थेचा अत्यंत मूलगामी विचार दिसतो. विशेषत: ‘गुणकम र्-विभागश:’ या गीतावचनाचा अर्थ विशद करताना त्यांनी दिलेले विविध संदर्भ वाचून तर मन थक्कच होते.
व्यक्तिधर्म व ब्राह्मणांचे कर्तव्य याबद्दलचे त्यांचे विवेचन मुळातूनच वाचायला हवे. व्यक्तिधर्म-विवेचनात ‘आसुरभाव’ आणि ‘शास्त्र’ याबद्दल लिहिताना ‘असुर’ शब्दाचा अर्थ त्यांनी वेदांव्यतिरिक्त पारशी व रोन संदर्भही देऊन (पृ. 444) विशद केला आहे. येथे नुसती विद्वता नाही, तर एक जबदरस्त ‘आतला आवाज’ आहे, हे सामान्य वाचकालाही जाणवेल.
द्रव्यलालसेने झालेला भिक्षुकांचा अध:पात आणि गृहस्थाश्रमी लोकांचा मिथ्याचार यामुळेच वेदविद्या लुप्त झाली आणि तिचे रक्षण करायचे असेल, तर सुशील गृहस्थ आणि वेदाध्ययनी नि:स्पृह भिक्षुक यांचे गुणधर्म असलेला नवा ‘उपाध्याय’ तयार व्हावा, हा लखलखीत विचार अप्रबुद्धांनी मांडला आहे.
यापुढचे ‘ऋग्वेदाचा संदेश’ हे वैदिक संस्कृतिमालेचे तिसरे पुष्प. पाश्चात्त्यांनी अपलाप केलेल्या वैदिक संस्कृतीचे खरे दर्शन घडवून ऋग्वेदात अनुस्यूत असलेला संदेश प्रकट करणे, हे या ग्रंथाचे प्रयोजन. श्रुतिबोधकार रा. वि. पटवर्धनांनी प्रारंभीच्या अभिप्रायात म्हटले आहे की, ‘वैदिक संस्कृतीची खरी कल्पना आणि तिचे साध्य यांचे यथोचित चित्र वाचकांच्या मनश्चक्षूंपुढे चित्तवेधक भाषेने उभे करणारा असा दुसरा सरस ग्रंथ माझ्या पाहण्यात नाही.’ हा अभिप्रायच पुरेसा बोलका आहे.
या ग्रंथात एकूण 9 प्रकरणांतून ऋग्वेदकालीन संस्कृतीच्या स्वरूपाचे सर्वंकष विवेचन आहे. संस्कृती, संशोधनशास्त्र, वैदिक धारणा इत्यादींविषयी येथे यथातथ्य मार्गदर्शन आहे आणि तेही प्रमाणपुरस्सर! प्रारंभीच एक वेधक वाक्य आहे की, ‘सर्वात घातक अज्ञान म्हणजे स्वत:विषयीचे अज्ञान!’ आणि वेदविषयक संस्कृतीचे संशोधन करणारे लोक याच रोगाने म्हणजे वैदिक संस्कृतीविषयक अज्ञानाने ग्रस्त आहेत, हेच शल्य अप्रबुद्धांना अत्यंत खुपत होते. ते दूर करण्यासाठी वैदिक संस्कृतीचे साकल्याने आकलन करून देण्यासाठीच या ग्रंथाची निर्मिती झाली असावी.
या खंडात शेवटी आहे ‘वेदांचे अपौरुषेयत्व’ हा दीर्घ लेख. हा मुळात पं. सातवळेकरांच्या विनंतीवरून त्यांच्या ‘वैदिक धर्म’ साठी लिहिला होता. ‘वेद हा संशोधनाचा विषय नसून प्रयोगशास्त्राचा विषय आहे,’ असे मत त्यांनी लेखाआधीच्या निवेदनातच नोंदविले आहे आणि मौज अशी की, लेखकाच्या सूक्ष्म आणि विवेचक ‘संशोधनदृष्टी’मुळेच हा लेख विशेष मननीय ठरला आहे. सर्व प्रकारचा सांगोपांग विचार असणाèया प्रस्तुत लेखाचे सार असे सांगता येईल की, 1) वेद हे ज्ञानभांडार आहे. 2) ज्ञानाची परिसमाप्ती तत्त्वज्ञानातच आहे (पृ. 749). 3) वेदांचे अपौरुषेयत्व आणि मंत्रार्थता यांना धक्का न लावता अभ्यासाचे एक स्वतंत्र अंग म्हणून त्यांच्या लौकिका चा विचार आणि त्याचा एक प्रकार म्हणून ऐतिहासिक पद्धती असण्यास काही हरकत नाही’ (पृ. 767).
‘समग्र अप्रबुद्ध (प्रवर-1)’ हा ज्ञानी आणि जिज्ञासू अशा दोन्ही वर्गासाठी अत्यंत उपयुक्त असा संदर्भग्रंथ ठरू शकतो. त्याच्या पुढील दोन खंडांची असंख्य वाचक आतुरतेने प्रतीक्षा करत असणार. अनुपलब्धतेच्या तिजोरीत बंद असलेला हा बहुमूल्य ऐवज सर्वांसाठी खुला करणाऱ्या प्रज्ञालोक अभ्यासमंडळाचे पुनश्च अभिनंदन!
डॉ. लीना रस्तोगी